शिवरायांच्या काळातील अथवा त्यानंतर ची पत्रे वाचताना तत्कालीन समाजव्यवस्था तर समजतेच पण त्याबरोबर त्याकाळी वापरली जाणारी भाषा आणि त्या अनुषंगाने केलेली शब्दांची योजना आपणाला खिन्न करून सोडतात. ऐतिहासिक पत्रं म्हटलं की मोडी आणि फारसी यांची माहिती असणे जरुरी आहे. जितकी व्यवस्थित पत्रे मोडी लिपीतील असतात तितकी फारसी पत्रे दिसत नाहीत.
मोडी लिपी आणि पत्रे याविषयी जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
या पत्रांचा अभ्यास करताना इतिहास संशोधक वा. सी. बेंद्रे म्हणतात
नवीन विचारमालिका रूढ करणारे पुरुषश्रेष्ठ अगदी विरळाच सापडतात. भूतकालच्या अनुभवाच्या पायावर विचारसरणीची इमारत चढविणे मात्र तितकें दुःसाध्य नसतं. म्हणून मनुष्यप्राणी प्रथम या भूतकालीन ज्ञानाची अपेक्षा करतो व या ज्ञानाच्या साहाय्याने तो आपल्या विचारांत भर टाकून आचारांची दिशा ठरवीत असतो. ज्ञानसंवर्धनाला व त्याबरोबर देशाच्या अगर समाजाच्या प्रगतीला हा भूतकालीन अनुभवाचा अथांग ज्ञानसागर मंथन करणे इष्ट असते म्हणून सामान्य कर्ती माणसें या ज्ञानसागरांतील निधि बाहेर काढण्याच्या खटपटीला लागलेली दिसतात.
- साधन चकित्सा प्रस्तावना खंड
१) श्रीकार
२) शिक्का
३) कालगणना
४) मायना
५) मुख्य मजकूर
६) समाप्ती मुद्रा
वर उल्लेखित मुद्दे कुठे आणि कोणत्या स्वरूपात वापरायचे याचे नियम ठरलेले असून त्याविषयी सविस्तर माहिती पुढे घेऊ.
शिवकाळात पत्र नक्की कोणत्या कारणास्तव लिहिले त्यावरून त्याचे ८४ प्रकार पडतात ते येथे जाणून घ्या
श्रीकार
पत्राच्या सुरवातीला आपले आराध्य दैवतेचे नाव लिहले जाते अथवा ''श्री" हा शब्द लिहला जातो. शिवरायांच्या बहुतेक पत्रात श्री येतो तर कधी 'श्री शंकर', 'श्री तुळजाभवानी', 'श्री भवानी शंकर', 'श्री शंकर प्रसन्न', 'श्री ज्ञानदेव' असे श्रीकार येतात. अजून एक महत्वाचा मुद्दा येथे लक्षात घेण्यासारखा आहे तो म्हणजे श्रीकार लिहिताना दिसून येतो तो आदरभाव. एखाद्या पूज्य व्यक्तीला पत्र लिहिताना योग्य तो आदर देण्यासाठी त्या व्यक्तीचे नाव पत्राच्या सुरवातीला एकदाच लिहिले जाते आणि जिथे जिथे त्या व्यक्तीच्या नावाची पुनरावृत्ती होईल तिथे तिथे जागा रिकामी ठेवली जाते. मोरया गोसावी अथवा समर्थ रामदासांना लिहलेल्या पत्रात या गोष्टी आपण पाहू शकतो. आदरभाव दाखविण्याच्या अशा अजून पद्धती पुढे देखील आपण पाहणार आहोत.
लेख कितपत महत्वाचा आहे यावरून त्यावर अजूनही काही अक्षर लिहिली जातात. जसं की एखादे पत्र किंवा महजर जास्त पानांचा असेल तर त्या पांनांची संख्या नमूद केली जाते. समजा एखादा महजर १० पानांचा असेल तर त्यावर १\१० लिहलेले असते तसेच एखाद्या महजराचे ४ वेगवेगळे भाग असतील तर ४\१ लिहलेले दिसते.
ऐतिहासिक पत्रातील रेघांचे देखील असतात प्रकार | जाणून घ्या त्यांची नावे आणि वापरण्याच्या पद्धती
शिक्का
१) लेखनालंकार
२) मर्यादेय विराजते
३) लेखनसीमा
४) लेखनाधिकार
मुख्य प्रधान यांनी सर्व राजकार्य करावे. राजपत्रांवरी शिक्का करावा.
मायना म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो तो स.न.वि.वी. ( सप्रेम नमस्कार विनंती विशेष). पण पूर्वी इतके साधे मायने नव्हते. पत्रातील मायने वाचून पत्राचे वजन लक्षात येते. कोणता मायना कोणासाठी, स्त्रियांसाठी काय मायना असावा, त्यात ती स्त्री लग्न झालेली असेल तर काय लिहावे किंवा पुरुषासाठी असेल तर त्याचे वय, हुद्दा लक्षात घेतला जात.
शिवराय सुरवातीला मुस्लिम पद्धतीने मायना लिहीत म्हणजे
अजरख्तखाने शिवाजी राजे दामदौलतहू बजानेब कारकुनानी हवालदारानी हाल व इस्तकबिल
अर्थात, शिवाजी राजे यांच्या कचेरीतून हे पत्र सध्या आहेत व इथून पुढे असतील अशा कारकून व हवालदार यांसाठी आहे. राज्यभिषेकानंतर मात्र ही पद्धत बदलून शिवरायांनी हिंदू पद्धतीने कालगणना सुरू केली. त्यानंतर मायने पुढीलप्रमाणे सुरू झाले.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ( चालू राज्याभिषेक शक, संवत्सर, माह, तिथी, वार)
कित्येक वर्षांनंतर पत्रावर हिंदू कालगणना वापरण्याचे धाडस उरी बाळगणारे छत्रपती शिवराय हे एकमेव राजे झाले.
राज्याभिषेक विषयी सविस्तर वाचा
शिवाजीने पत्रांचे मायने देखील अशाच पद्धतीने सुधारले
सकल सौभाग्यवती वज्र चुडेमंडितसौभाग्यवती मातोश्रीश्रीमत् महाराज मातुश्री आईसाहेब
ऐसी खबर कळो आली की...तुम्ही पात्र पाठवले ते उत्तम समयी पावले...तुम्ही पत्र पाठविले ते आसीर्वादपूर्वक वाचन लिहिली ते कलोन समाधान जाले...तुमचे बाबे हुजुर खबर मालुम जाली जे...हूजुर येऊनु मालुम केले जे...
रिकामें बसून, लोकहाती नाचीज खाववून, काळ व्यर्थ न गमावणे, कार्यप्रयोजनाचे दिवस हे आहेती, वैराग्य उत्तरवयी कराल, ते थोडे आजही उद्योग करून आम्हांसी (पराक्रमाचे) तमासे दाखविणे.
.... हवालदारास घर व लोकास अळंगा मजबूत करूनु देणे. घर व अळंगा करूनु द्याल त्या पावसाने आजार न पावे ऐसा करूनु देणे. नाही तरी सजवज करूनु द्याल...
समाप्ती मुद्रा
पत्राची सुरवात इतकी मस्त असते तर शेवट देखील तितकाच वैशिष्ट्य पूर्ण असावा. शेवट कसा करावा याचे देखील तंत्र पूर्वी ठरलेले होते. यासाठी काही ठराविक शिक्के असतं यांना 'मर्यादा मुद्रा' किंवा 'मोर्तब' म्हणत. यावर कोरलेली अक्षरे ठरलेली होती. पत्राचा शेवट जेथे करावयाचा तेथे शेवटच्या शब्दाला अगदी चिकटून हे शिकले मारले जात जेणेकरून पत्रातील मजकुराशी कुणी छेडछाड नाही करणार. या शिक्क्यातील मजकूर खालील प्रमाणे असतात.
मर्या देयं विराजते
लेखनसीमा
इतिमर्यादा
इत्यलम
पत्रावधिरंय भाती
अजून एक महत्वाची गोष्ट इथे नमूद करावी वाटते. या शिक्यांच्या आधी किंवा शिक्क्या ऐवजी काही वाक्ये आढळतात. आता ही वाक्ये काही ठिकाणी खाश्याच्या हस्ताक्षरात देखील दिसतात. म्हणजे संपूर्ण पत्र त्या व्यक्तीचा लेखनिक लिहतो पण त्याचा शेवट मालक करतो. मुख्य व्यक्ती पत्राचा शेवट करताना पत्र वाचून मग शेवटी एक वाक्य लिहितो आणि त्यापुढे मग मोर्तब केली जाते. शिवरायांच्या पत्रात अशी वाक्ये आढळतात. इतर मजकूर आणि पत्र समाप्तीची ओळ काही ठिकाणी वेगळी दिसते पण ती नक्की शिवरायांनी लिहिली का? यावर प्रश्नचिन्ह उभे राहते कारण शिवरायांची जेमतेम पत्र उपलब्ध आहेत ज्यातून शिवरायांचं हस्ताक्षर नेमक कोणतं हे समजणे अवघड आहे. पत्राचा शेवट करण्यासाठी शिवरायांच्या पत्रात आलेली काही वाक्ये खालील प्रमाणे
जाणिजे
बहुत काय लिहिणे
कौल असे
हे बरे म्हणून वर्तणूक करणे
बहुत लिहिणे नलगे
कोणे गोष्टी चिंता न करणे
उजुर न करणे
एक जरियाची तसविस न देणे
ताकीद असे
हे बरे म्हणून वर्तणूक करणे
ऐसे समजून वर्तणूक करणे
छत्रपती शाहू महाराज यांच्यानंतर पत्र समाप्तीची वाक्ये जसे की 'सुज्ञ असा', 'लेखनालंकार', 'सुज्ञ असा' स्वतःच्या हस्ताक्षरात लिहले जात.
अशा प्रकारे शिवरायांच्या काळी पत्रे कशी होती याचा थोडा विचार येथे केला आहे. शिवरायांचे एक एक पत्र अभ्यासायचे म्हटले तर त्यावर प्रबंध होतील इतके गहन अर्थ त्याचे होतात. त्यामुळे इथे फक्त काही महत्वाचे मुद्दे, पत्रे घेऊन आणि काही ठराविक बाबींचा विचार करून उहापोह केला आहे.
कृपया काही सूचना असतील तर कमेंट मध्ये लिहावे जेणेकरून update करता येईल.



1 टिप्पण्या
मुद्रा/शिक्का याचा आकार हुद्द्या नुसार असे का?
उत्तर द्याहटवाजसे की राजा (शिवाजी महाराज)=अष्टकोनी
देशमुख/देशपांडे=वाटोळा(गोल)
Thanks for Comment and suggestions